Saturday, 16 July 2011

आळशी माणसं...

"आळशी माणसं खुप हुशार असतात". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.

आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.

ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही - प्रत्यक्ष पाहिलं आहे.

हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर.

ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे.

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही?

No comments:

Post a Comment